
भारतीय संस्कृती आणि सण
‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ अशी उदात्त धारणा असलेली आपली भारतीय संस्कृती आहे. सर्वसमावेशक अशी आपली उदात्त संस्कृती आहे, म्हणूनच आजही या भारत देशात ‘विविधतेत एकता’ नांदताना आपल्याला पहायला मिळते. आपल्याकडे संपूर्ण वर्षभर वैविध्यपूर्ण सण-उत्सवांची रेलचेल असते. खरं तर या सर्व रूढी, परंपरा, आपल्या संस्कृतीची मूल्ये हा आपल्या जीवनाचा मूळ गाभा आहे. त्यांच्या ओळख आणि आचरणानेच आपले आयुष्य समृद्ध होते. म्हणूनच आपल्या भारत राष्ट्राच्या समृद्धीचा, प्रगतीचा विजयध्वज जगाच्या पाठीवर फडकण्यासाठी आजची पिढी सुसंस्कारित बनणे आवश्यक आहे. आजचे सुसंस्कारित बालक उद्याचे सुजाण नागरिक असणार आहेत. यासाठीच आपल्या बाल संस्कार वर्गात आपली संस्कृती अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांद्वारे मुलांमध्ये रुजविण्याचे कार्य केले जाते.
आपल्या संस्कृतीतील सर्व सण, ते साजरे करण्यामागील कारणे, त्यांचे फायदे, तसेच आपल्याकडील अनेक परंपरा रूढी अनाकलनीय असतात. त्या आचरणात आणण्यामागील समर्पक कारणे आजच्या जिज्ञासू पिढीला मिळाल्यास त्यांच्याकडून मनापासून या गोष्टी निश्चितच आचरणात आणल्या जातात. यासाठीच ही सर्व मूल्ये बालकांमध्ये प्रभावीपणे रुजविण्याचे कार्य केले जाते.
