ध्यानधारणा आणि सकारात्मक पुष्टीकरण
कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी हवी असते एकाग्रता, आणि त्यासाठी गरजेचे असते मानसिक स्वास्थ्य. कवीने ‘मन उधाण वाऱ्याचे....’ असे या चंचल मनाचे काही उगाच वर्णन केले नाहीये. आपल्या चंचल मनाला त्यात येणाऱ्या सततच्या वेगवेगळ्या विचारांना नियंत्रित करणे खरंच गरजेचे आहे. अशा या उधाण मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण बाल संस्कार वर्गात दररोज Positive Affirmations म्हणजेच सकारात्मक पुष्टीकरण घेतो. ध्यान धारणा आणि सकारात्मक पुष्टीकरणाद्वारे मनात येणाऱ्या विचारांना आपण योग्य दिशा देऊ शकतो आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर नियंत्रण नक्कीच ठेऊ शकतो. या गोष्टींचे आपल्याला होणारे फायदे अगणित आहेत.
ध्यानधारणेमुळे आपल्या अनेक आरोग्य विषयक समस्या कमी होतात, मन स्पष्ट होते, अंतर्ज्ञान विकसित होते, अनेक गोष्टींचे नकारात्मक प्रभाव दूर होतात, मनावरील ताण कमी होण्यास मदत होते, चांगली झोप लागण्यास मदत होते, आपल्याला उच्च कोटीची मानसिक शांती आणि आनंदप्राप्ती होते. म्हणूनच आपल्या बालसंस्कार वर्गात ध्यान आणि सकारात्मक पुष्टीकरणे यांचा समावेश केला आहे.
काही सकारात्मक पुष्टीकरणे:
- १. मी एक अत्यंत बुद्धिमान,समजूतदार, प्रामाणिक आणि प्रेमळ व्यक्ती आहे.
- २. मी माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा मनापासून आदर करतो.
- ३. मला माझ्या आई वडिलांबद्दल अभिमान वाटतो.
- ४. मी एक उत्साही व्यक्तिमत्त्व आहे.
- ५. मला दिलेली कामे मी वेळेवर अचूकपणे करण्याचा प्रयत्न करतो.
- ६. मी इतरांना मदत करण्यास सदैव तयार असतो.
