प्रार्थना आणि श्लोक
आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या विविध प्रार्थना ,श्लोक आणि स्तोत्रे. प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असल्याचे मानले जाते. हजारो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी,साधू-संतांनी ती ओळखली.त्यातूनच अनेक प्रकारचे मंत्र,स्तोत्रे आणि प्रार्थना इत्यादी निर्माण केल्या.त्यातून त्यांनी एक शाश्वत जीवन आधार बनलेला परमानंद अनुभवला आणि जगालाही दिला.
प्रार्थना म्हणजे प्रेम आणि ओढीने ईश्वराची वाट पाहणे.प्रार्थनेमुळे ईश्वराबद्दल परम आदराची भावना निर्माण होते. आपल्या जीवनशैलीचा भाग असलेल्या या प्रार्थना ,श्लोक आणि स्तोत्रे म्हणजे जणूकाही परमेश्वराला मनापासून दिलेली हाकच होय. अशाच काही ईश्वरी शक्तीला वंदन करणाऱ्या अनेक वैविध्यपूर्ण प्रार्थना, श्लोक, स्तोत्रे आपल्या बाल संस्कार वर्गात अत्यंत आनंददायी वातावरणात शिकविल्या जातात, ज्याद्वारे मुलांना या सर्व गोष्टींची आवड निर्माण होते, मुले मंत्रपठणाद्वारे लाभणारी सकारात्मक उर्जा अनुभवू शकतात आणि आपल्या संस्कृतीतील या अमूल्य ठेव्याचे संवर्धनही होते.
